नुकताच गणेशोत्सव होऊन गेला, म्हणून त्या निमित्ताने माझ्या आयुष्यातले उंदीर मामाचे काही किस्से सांगणार आहे.
लहानपणी पुण्यात असताना आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायचो. घरात हापूस आंबे आणले, की कसे कुणास ठाऊक पण उंदीर मामांना त्याची बित्तम बातमी लागायची. म्हणजे पुण्यातले लोक तर खवय्ये असतातच, भरीस भर म्हणजे उंदीर सुद्धा चोखंदळ निघाले. आजी कोकणात वाढलेली आणि मी पुण्यात. प्रत्येक पिढीगणिक प्राणी मारायची क्षमता कमी होत गेलेली. आई पाली मारू शकायची, पण आम्हा मुलांची मजल फक्त डास आणि झुरळ मारायची. त्यामुळे फक्त आजी विरुद्ध उंदीर अशी खडाजंगी असायची. एकदा रात्री आजी आवाजाने उठली, आणि अंधारातच दिवे न लावता हाताशी जे आले ते आवाजाच्या दिशेनी भिरकावून लावलं आणि कसा तो तिचा नेम अगदी अचूक बसला. पुढचे काही दिवस मात्र आम्ही मुले आमच्यावर काही बरसू नये यासाठी एकदम काटेकोर होतो. पुढे रक्त न गोठणारं उंदीर मारायचं औषध आलं आणि मग आपसूकच उंदीर मामांची वार्षिक वारी बंद झाली आणि आजीला अजून एखादं शौर्य पदक मिळायची संधी हुकली.
अभियांत्रिकी पूर्ण करून मी अमेरिकेत स्थायी झाले. फ्लोरिडातील मेलबॉर्न शहरात नोकरीनिमित्त वास्तव्याला असताना आमच्या खालच्या मजल्यावर एक मराठी मुलगा रहायचा. तिथल्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थीगटाचा तो तत्कालीन अध्यक्ष होता, आणि अत्यंत गोष्टीवेल्हाळ होता म्हणून जवळपास प्रत्येकाशी त्याची ओळख होती. जिन्यावरून येता जाता आमची ओळख झाली आणि काही दिवसांनी त्याने मला घरी बोलावले. त्याच्याकडे काचपेटीत असलेला छोटा पाळीव बॉल पायथन अजगर मोठ्या कौतुकाने तो मला दाखवत होता. त्या अजगराला खायला द्यायला त्याच्याकडे बरेच गोठवलेले इटुकले पिटुकले उंदीर होते. नवजात बाळाचा बाबा असल्याच्या थाटात त्याने साप पूर्वी किती उंदीर खायचा, आता किती खातो याचा लेखाजोखा दिला. त्याने मोठ्या उत्साहाने मला सापाला हात लावण्याचा किंवा त्याला एखादा उंदीर भरवण्याचा आग्रह केला पण मी मात्र त्याला न दुखावता तिथून पळता पाय कसा काढू या विवंचनेत होते. पुढील अनेक दिवस मी तो साप किंवा त्याचे उंदीर त्याच्या घरातून पलायन करून वातानुकूलनाच्या वाहिन्यांद्वारे माझ्या डोक्यावर येऊन तर पडणार नाहीत ना या चिंतेत होते.
कॅलिफोर्नियातली माझी एक जिवलग मैत्रीण लग्नानंतर न्यू यॉर्क ला गेली. कॅलिफोर्नियात असताना ती कॅलट्रेनने बराच प्रवास करायची त्यामुळे न्यू यॉर्कला सबवेतून दाटीवाटीने प्रवास करायला ती लगेच सरावली. पण सबवे म्हणजे आपलीच जहागिरी आहे या थाटात भटकणाऱ्या उंदरांची कोणाला कशी सवय होणार? एकेकाळी "ब्रिटिश साम्राज्यावर कधीही सूर्यास्त होत नाही" या ताठ्यात असलेल्या लंडनवासीयांना उंदरांनी अगदी हैराण करून सोडले होते, आणि आजच्या मितीलाही न्यू यॉर्क सारख्या जगाच्या आर्थिक राजधानीला उंदरांपासून मुक्ती नाही!
कॅलिफोर्नियाच्या वासात उंदीर दिसले नाहीत म्हणून मी जरा गाफील झाले खरी, पण उंदीर मामा माझ्या प्रवासाच्या कुठल्याच टप्प्यावर मुक्काम सोडायला तयार नव्हते. काही वर्षांपूर्वी ग्रँड कॅन्यन ला गेलो होतो. तिथे नॅशनल पार्कची बंगली मिळणं महा कठीण, पण आम्ही जास्त वर्दळ नसलेल्या "नॉर्थ रिम"ला जायचं ठरवलं आणि नशिबाने तिथे त्यांच्या मुख्यालयाच्या अगदी शेजारची बंगली आम्हाला मिळाली. आमच्यासोबत माझी एक मैत्रीण होती आणि ती नुकतीच PhD संपवून एका कर्करोग संशोधनाच्या कंपनीत रुजू झाली होती. गळाभेट झाल्यावर पहिल्या कामाचा अनुभव कसा आहे असं विचारताच तिने सांगितले - पहिल्याच दिवशी कार्यालयात पाऊल टाकले न टाकले तोच तिच्या बॉसने ताटभर उंदीर तिच्या पदरी घातले! आता तिचे उंदीर तिच्याशिवाय ३ दिवस कसे जगणार अशी आम्ही तिची फिरकी घेत होतो. पण ती मात्र थोडी उदास झाली आणि म्हणाली ह्युस्टनला (Houston, Texas) आलेल्या पुरात तिच्या PhD संशोधनाचे उंदीर वाहून गेले आणि तिला ते संशोधन पुन्हा पहिल्यापासून करावे लागले, आणि तिची PhD त्यामुळे अजून लांबली.
वास्तव्याच्या पहिल्या दिवशी आम्ही ग्रँड कॅन्यन पासून थोड्या दूर असलेल्या पेज (Page, Arizona) या ठिकाणी पर्यटन करून रात्री वाटेत असलेल्या एका गावी थांबलो. दुसरा दिवस ग्रँड कॅन्यन फिरण्यात घालवला, आणि रात्री ग्रँड कॅन्यन लॉजच्या खानावळीत जेवलो. आता विशेष म्हणजे तिथे "गव्याचे मांस" असे कधीही न ऐकलेले पदार्थ होते पण शाकाहारी लोकांसाठी चार भाज्या बनवायला मात्र त्यांना जड! अर्थात आम्हाला सुद्धा याचा अंदाज होताच म्हणून आम्ही पेज मधून बरीच फळं आणि फराळ सोबत आणला होता. दिवसभर उन्हात फिरून आलेला क्षीण आणि रात्री आकाशगंगेचं दर्शन घेण्यात झालेला उशीर, म्हणून झोप लगेच लागली. रात्री काहीतरी खुडबुड ऐकू आली पण त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तिसऱ्या दिवशी आमचं परतीचं विमान होतं. लाल रंगाच्या दगडांवर सूर्योदयाची स्वर्णिमा बघायची संधी मला घालवायची नव्हती, म्हणून माझ्या निद्राप्रिय नवऱ्याला सोडून मी एकटीच भल्या पहाटे उठून सूर्योदय बघायला गेले. दिवा न लावता हाताला लागतील ती फळं सोबत घेऊन निघाले. तिथे संपूर्ण कॅन्यन समोर दिसेल अश्या एका दगडावर चढून मी सोबत घेतलेले केळे खाऊ लागले. एखादा घास खाऊन झाला तोच मला केळ्यावर चावल्याचे निशाण दिसले, आणि रात्री ऐकू आलेल्या खुडबुडीचे कोडे सुटले! नेमकं त्या दिवशी आभाळ ढगाळ होतं आणि सूर्योदय सुद्धा विशेष काही दिसला नाही म्हणून दिवसाचा अगदी हिरमोड झाला. तिथे असताना मजेत "उंदरांना तुझी फार आठवण येत असणार म्हणून तुला शोधत ते ग्रँड कॅन्यन पर्यंत पोचले" असे मैत्रिणीचे पाय खेचले खरे पण ... कॅलिफोर्नियात परतल्यावर दोन दिवसांनी मला ताप भरला आणि त्याचसोबत उंदरामुळे तर काही झालं नसेल ना या विचाराने चांगलीच धडकी पण भरली. नॅशनल पार्कच्या मुख्यालयात फोन आणि ई-मेल केला पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. डॉक्टर कडे जाऊन म्हणाले की प्लेग नाही पण मला हंटा व्हायरस ची भीती आहे. त्या डॉक्टर नी CDC च्या बातम्यांमध्ये नॉर्थ रिम जवळ हंटा व्हायरस चा सध्या प्रसारआहे का असं शोधून काढले आणि अशी काही बातमी नाही असं बघून एकदाचा जीव भांड्यात पडला.
त्यानंतर काही वर्षांनी मिनियापोलीसला (Minneapolis, Minnesota) कांचन नावाच्या मैत्रिणीची PhD लॅब बघायला गेलो होतो. मैत्रीण आमच्यासारखी अभियंता, आणि नंतर तिने हृदयविकार संशोधनात PhD केली. तिच्या संशोधनात ती पेसमेकर सारख्या उपकरणांसाठी MATLAB प्रणाली लिहिते, आणि तिची प्रणाली कशी चालते ते बघण्यासाठी ती ते उपकरण उंदरांच्या हृदयात बसवते. ती उंदरांना कसे पकडते आणि त्यांना काचेच्या नळीत कोंडून त्यांचं हृदय काढून त्यात उपकरण कसे बसवते याचं रोमांचकारक वर्णन तिने दिले. आमच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मैत्रिणीने खूप निरागसपणे पुढे त्या उंदरांचे काय होते असं विचारले, आणि ते जैविक कचरा म्हणून टाकले जातात ऐकून तिला थोडा धक्काच बसला. कांचनने सांगितले की पहिले पहिले उंदीर हाताला चावतात, मारताना मानसिक त्रास होतो पण हळू हळू सवय होते. तिची PhD लॅब बघणं खरंच आमच्यासाठी एक आगळा वेगळा अनुभव होता.
काही वर्षांनी नवऱ्याने कामानिमित्ताने कॅनडाला मुक्काम हलवला, आणि काही दिवसांनी मी त्याला भेटायला गेले. वॅनकूवर विमानतळातून बाहेर पडून गाडी भाड्याने घ्यायला गेलो. आणि नेमका त्यांच्या दुकानासमोर मला उंदीर दिसला. कॅनडाची पहिलीच वारी आणि प्रथम ग्रासे मक्षिका पात: ! नशिबाने निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या देशाने "First impression is the last impression" ही म्हण खोटी ठरवली. अशी ही उंदीर पुराणाची कहाणी पुण्याहून सुरू होऊन कॅनडाच्या साठा उत्तरी समाप्त. आता पुढची गाठ कुठे पडते, ते उंदीर मामांच्याच मर्जीवर! तोवर, "उंदीर मामा की जय!"