नुकताच गणेशोत्सव होऊन गेला, म्हणून त्या निमित्ताने माझ्या आयुष्यातले काही उंदीर मामाचे किस्से सांगणार आहे.
लहानपणी पुण्यात असताना आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायचो. घरात हापूस आंबे आणले, की कसे कुणास ठाऊक पण उंदीर मामांना त्याची बित्तम बातमी लागायची. म्हणजे पुण्यातले लोक तर खवय्ये असतातच, भरीस भर म्हणजे उंदीर सुद्धा चोखंदळ निघाले. आजी कोकणात वाढलेली आणि मी पुण्यात. प्रत्येक पिढीगणिक प्राणी मारायची क्षमता कमी होत गेलेली. आई पाली मारू शकायची, पण आम्हा मुलांची मजल फक्त डास आणि झुरळ मारायची. त्यामुळे फक्त आजी आणि उंदीर अशी खडाजंगी असायची. एकदा रात्री आजी आवाजाने उठली, आणि अंधारातच दिवे ना लावता हाताशी जे आले ते आवाजाच्या दिशेनी भिरकावून लावलं आणि कसा तो तिचा नेम अगदी अचूक बसला. पुढचे काही दिवस मात्र आम्ही मुले आमच्यावर काही बरसू नये यासाठी एकदम काटेकोर होतो. पुढे रक्त न गोठणारं उंदीर मारायचं औषध आलं आणि मग आपसूकच उंदीर मामांची वार्षिक वारी बंद झाली आणि आजीला अजून काही शौर्य पदक मिळायची संधी हुकली.
पुढे अनेक वर्षांनी आम्ही अमेरिकेत असताना ग्रँड कॅन्यन ला गेलो होतो. तिथे नॅशनल पार्क ची बंगली मिळणं महा कठीण, पण आम्ही जास्त वर्दळ नसलेल्या नॉर्थ रिम ला जायचं ठरवलं आणि तिथे त्यांच्या मुख्यालयाच्या अगदी शेजारची बंगली आम्हाला मिळाली. वास्तव्याचा पहिला दिवस आम्ही तिथून थोड्या दूर असलेल्या पेज (Page , AZ) या ठिकाणी पर्यटन करून आलो.रात्री ग्रँड कॅन्यन च्या मुख्यालयात जेवलो. आता विशेष म्हणजे तिथे गव्याचे मांस असे कधीही न ऐकलेले पदार्थ होते पण शाकाहारी लोकांसाठी चार भाज्या बनवायला मात्र त्यांना जड! अर्थात आम्हाला सुद्धा याचा अंदाज होताच म्हणून आम्ही पेज मधून बरीच फळं आणि फराळ सोबत आणला होता. दिवसभर उन्हात फिरून आलेला क्षीण आणि रात्री आकाशगंगेचं दर्शन घेण्यात झालेला उशीर, म्हणून झोप लगेच लागली. रात्री काहीतरी खुडबुड ऐकू आली पण त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी कॅन्यन मध्ये फिरण्यात दिवस घालवला आणि तिसऱ्या दिवशी आमचं परतीचं विमान होतं. लाल रंगाच्या दगडांवर सूर्योदयाची स्वर्णिमा बघायची संधी मला घालवायची नव्हती, म्हणून माझ्या निद्राप्रिय नवऱ्याला सोडून तिसऱ्या दिवशी मी एकटीच भल्या पहाटे उठून सूर्योदय बघायला गेले. नवऱ्याला उठवायला नको म्हणून मी दिवा न लावता हाताला येतील ती फळं सोबत घेऊन निघाले. तिथे संपूर्ण कॅन्यन समोर दिसेल अश्या एका दगडावर चढून मी सोबत घेतलेले केळे खाऊ लागले. एखादा घास खाऊन झाला तोच मला दिसले की केळ्यावर चावल्याचे निशाण दिसत होते. त्यातून नेमकं त्या दिवशी आभाळ ढगाळ होतं आणि सूर्योदय सुद्धा विशेष काही दिसला नाही म्हणून दिवसाचा अगदी हिरमोड झाला. कॅलिफोर्नियात परतल्यावर दोन दिवसांनी मला ताप भरला आणि त्याचसोबत उंदरामुळे तर काही झालं नसेल ना या विचाराने चांगलीच धडकी पण भरली. नॅशनल पार्क च्या मुख्यालयात फोन आणि ई-मेल केला पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. डॉक्टर कडे जाऊन म्हणाले की प्लेग नाही पण मला hantavirus ची भीती आहे. त्या डॉक्टर नी CDC च्या बातम्यांमध्ये नॉर्थ रिम जवळ hantavirus चा सध्या प्रसार आहे का असं शोधून काढले आणि अशी काही बातमी नाही असं बघून एकदाचा जीव भांड्यात पडला.
काही वर्षांनी नवऱ्याने कामानिमित्ताने कॅनडा ला मुक्काम हलवला, आणि काही दिवसांनी मी त्याला भेटायला गेले. म्हटलं, उंदीर मामांनी आता तरी सुट दिली असेल...पण वॅनकूवरच्या विमानतळावर उतरताच त्यांनी पुन्हा दर्शन दिलं! वॅनकूवर विमानतळातून बाहेर पडून गाडी भाड्याने घ्यायला गेलो. आणि नेमका त्यांच्या दुकानासमोर मला उंदीर दिसला. कॅनडा ची पहिली च वारी आणि प्रथम ग्रासे मक्षिका पात: ! नशिबाने निसर्गसौंदर्याने नटलेल्या या देशाने First impression is the last impression ही म्हण खोटी ठरवली. अशी ही उंदीर पुरणाची कहाणी पुण्याहून सुरू होऊन कॅनडा च्या साठा उत्तरी समाप्त. आता पुढची गाठ कुठे पडणार, ते बघायचं!
No comments:
Post a Comment