मनात बऱ्याच विचारांचा काहूर .. म्हणलं श्रीकांत आणि शशांक ला जमतंय तर मी पण इथे देवनागरीत लिहून पहावं.. शेवटी मातृभाषेतच आपण स्वतःला मनसोक्त व्यक्त करू शकतो..
तर सुरुवात अशी झाली..पुण्यात असताना 'सकाळ'चं पारायण केल्याशिवाय दिवस पुरा व्हायचा नाही, इथे येऊन फरक इतकाच पडला की सकाळ सोबत ४ गोष्टी अजून वाचल्या जाऊ लागल्या. असंच वाचताना हे गवसले..
हे हिंदु शक्तिमध्ये निर्माण झालेल्या, अंधाराचा नाश करणाऱ्या प्रखर तेजा,
हे हिंदूंनी केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वरी सामर्थ्या,
हे हिंदूंचे वैभव असणाऱ्या, सौभाग्य असणाऱ्या आणि कल्याणकारी अलंकारा,
हे हिंदूंमध्ये निपजलेल्या, दुष्टांचा कर्दनकाळ असलेल्या नरसिंहा, प्रभो शिवाजी राजा
हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करते.
अंतःकरणातील उचंबळून आलेल्या भावना तुझे अभिनंदन (गुणगान ) करतात.
मी तुझ्या पायाशी माझे भक्तिरूपी चंदन अर्पण करतो.
ज्या तुला उघडपणे सांगू शकत नाही अशा माझ्या मनातील इच्छा ( 'माझ्या मातृभूमीला स्वतंत्र करावेस' हीच ती इच्छा असणार) तू पूर्ण कर.
हे फार संस्कृत-प्रचुर असल्या कारणानी म्हणे अर्थ समजायला अवघड आहे. मला तर असं वाटलं नाही बुवा.. कदाचित ५ वर्ष संस्कृत शिकल्यामुळे असावं..पण नुसतं शिकण्यापेक्षा त्यातली २ वर्ष मी संस्कृत जगले आहे. मराठी आणि एकंदरच भाषांची आवड आई-आजी कडून वारसाहक्कानी मिळालेली, 'चिंटू' मुळे कोणी न शिकवताच स्वतःहून मराठी वाचता यायला लागलेलं..दादाला मुंजीत मिळालेली एकजात सगळी पुस्तकं त्याच्या आधी मीच वाचलेली. शाळेत संस्कृत आणि german मधून काय निवडावं हा प्रश्न त्याच्यामुळे कधी उद्भवलाच नाही. संस्कृत च्या वर्गात जीवष्य कंठस्य मानसी भेटली. व्याकरणाचा पाया शाळेत रोवला गेला..पण ferguson नी अक्षरशः भाषेच्या विश्वात फिरायला शिकवलं. Ferguson नी cross reference नी गोष्टी गुंफून etymology चा विचार करायची दृष्टी दिली.
वरील पोवाड्यातील संभूत शब्दाचा अर्थ मी विसरलेले, पण पाया तर आहेच ना..
सम + भव असं verb root , त्याचं तद्धित रूप, पुढे mr . cross reference मदतीला आले - "संभवामि युगे युगे". संभव चा "जन्म घेणे" असा अर्थ इथे अभिप्रेत आहे. अश्या प्रकारे संभूत या शब्दाचा अर्थ गवसला आणि ही साठा उत्तराची कहाणी सफलपणे पार पडली.
पण एवढ्यावरच विचारांची चक्रे थोडी थांबतात. एका मित्राचं उत्तर आलं, की त्याला पण अर्थ माहित नव्हता. हा मित्र पु. लं. या विषयावर अखंड भाष्य करू शकतो म्हणजे त्याचं वाचन (हल्लीच्या पिढीच्या मानाने) दांडगं असावं. असं असताना यालाही अर्थ नये कळू! कुठेतरी आपण आपला ठेवा पुढच्या पिढी पर्यंत पोचवायला कमी पडतोय की काय! ( पक्की पुणेरी असल्याने पु लं च्या "पुणेकर" प्रमाणे मी देखील "आमच्या वेळी हे असं नव्हतं" type dialogues मारते :) ) आजीची आठवण आली..कितीतरी कविता, श्लोक येतात तिला. लहानपणी हे सगळं दिवेलागणीला म्हणलं जायचं आणि मलाही त्यातलं बरंचसं यायचं.. मग हे सगळं मी आता का विसरले आहे? "मोडी लिपी नावाचं मराठीशी संबंधित काहीतरी होतं" एवढंच का मागे उरलं आहे? 'आठवणीतल्या कविता' सगळ्यांच्याच विस्मरणात का गेल्या आहेत?
वेळ नाही हे standard कारण..
खरं उत्तर घरात सगळ्यांनाच माहित आहे.. पण चार चौघात बोलायची चोरी! जो माणूस जाहीर मत व्यक्त करतोय तो politician आहे म्हणून त्याच्या म्हणण्याला publicity stunt समजून हाणून पडायचा पराक्रम आपणच करतोय ना? नाटक/सिनेमात सगळ्यांना समजेल अशी भाषा पाहिजे म्हणत म्हणत आपण hinglish ला किती सहज अंगी भिनवलय.. "लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी" चं मी अनुभवलेलं सत्य " आपुल्या घरात हाल सोसते मराठी" हे आहे!
Dallas ला museums मध्ये भारतीय शिल्पकलेचे नमुने पहिले. त्यातले काही तर 4 th century B .C चे! काय असावी त्यांची बाजारातली किंमत! मला dollar किती सामर्थ्यशील आहे याच्याशी काही घेणं देणं नाहीये, ती शिल्प विकत घ्यायची ऐपत कोणा एकट्याची नसणारे एवढं कळण्याइतपत अर्थशास्त्र मी पण शिकलीये. थोडक्या पैश्यासाठी भारतीयच संस्कृती विकत आहेत. बव्हंशी हे उद्योग चालवणार्यांना निवडून देण्याचं परम पुण्य आपणच केलंय ना?
ऐकून आहे की अनेक भाषा मृत झाल्या कारण त्या बदलत्या काळाप्रमाणे प्रवाही राहिल्या नाहीत. आपण सगळी भेसळ करून फक्त जिवंत आहे दाखवण्यापुरता सांगाडाच मागे नाही ना ठेवणार आहोत?
एक काळ होता जेव्हा मी etymology ला career म्हणून निवडण्याच्या तयारीत होते. पण ती चाकोरी .... साचेबद्ध आयुष्याची security .. ते खुणावणारं अभियांत्रिकी career , ते intriguing electronic circuits .. ते वळण पुढे परत भेटणार असं intuition आहे, पण तोवर त्या लोकांनी (चार चौघात त्यांचं नाव घेण्याइतकी हिम्मत माझ्यात नाहीये) सरस्वतीला जाळून टाकलं नसलं म्हणजे मिळवली.

अगदी मर्मस्पर्शी लेख आहे...
ReplyDeleteशेवटचा भाग decrypt झाला नाही... किंबहुना key माहित असणाऱ्यांनाच उद्येशून लिहिला असावा.
My approach is quite different. कदाचित "मर्मस्पर्शी" हा शब्द मराठी नसेलही. पण अज्ञानाच्या अंधकारात कुजत बसण्यापेक्षा चुका करत, त्या कबुल करत पुढे चालावं हा हेतू. But today, even error correction is somewhat difficult. काही काळापूर्वी मी माझ्या तेव्हाच्या roommateला "तांकी" हा शब्द मराठीत वापरताना २-३ वेळा अडवलं. नाशकातही असं मराठी बोलतात ह्याचं मला आश्चर्य झालं. त्याला मी "तांकी" ऐवजी "जेणेकरून" वापर असं सुचवलं. हे ऐकून माझ्या अगदी जवळच्या मित्राला हसू आलं. "जेणेकरून" वापरण्या इतकं शुद्ध मराठी क्वचितच ऐकायला मिळतं (फक्तं मुंबईकरांना उद्येशून नव्हे, तर एकंदरीतच) असं त्याने मला सांगितलं. एका पुणेकराने एका मुंबईकराला असं सांगावं, ह्या परिस्थितीत मला हसावं कि रडावं हे सुचेना... खरंच "आपुल्या घरात हाल सोसते मराठी"!
P.S.: माझ्या मित्राचं मराठी तसं फार छान आहे. But that's not the point.
छान :) आणि ''जमवलंयस उत्तम'' :D
ReplyDeleteमुद्दे मांडतांना तपशील आणि मूळ विचार यांची सांगड घालणं तुला जरा अवघड गेलंय किंवा या गोष्टीकडे दुर्लक्ष झालंय. बरंच काही एकत्र सांगायचं असेल किंवा एकच मुद्दा वेगवेगळ्या अंगांनी फुलवायचा असेल तर हे होतं... असो, सगळ्यांचंच होतं ! सरावानं जमतं.
भाषा, संस्कृती या गोष्टी थेट दैनंदिन आनंदाच्या जेवढ्या जवळ तेवढं त्यांचं आयुष्य समृद्ध आणि दीर्घ बनतं.
मराठी किंवा इतर अनेक भाषा ''आग्रहाने'' रेटल्या तर त्या मर्यादित होत जातात...
भाषा माध्यम आहे, ते सुलभ असणं प्राथमिक आहे. त्यासाठी त्यात होत जाणारे बदल ही ''आपोआप'' होणारी गोष्ट आहे. हे अपरिहार्य आहे.
भाव जसे जात-धर्म-पंथ यापलीकडे जाऊन माणसांना जोडतात, तशीच भाषा असते.. ती जर बुद्धी-समाजस्तर-प्रतिभा यांच्या पलिकडे गेली तर ती स्थायी होते पण समृद्ध असेलच असे नाही.
(बोजड आणि काहीशा अप्रत्यक्ष मुद्द्यांबद्दल क्षमस्व, कधी लहर येते... :D )